गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राज्यात वाहन खरेदीत मोठी वाढ

महाराष्ट्रात यंदा वाहन खरेदीत वाढ

मुंबई, 31 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दुचाकी, चारचाकी आणि अन्य वाहनांच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाली आहे. मागील सात दिवसांत वाहन खरेदीचा उत्साह वाढलेला दिसून आला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाहन नोंदणी तब्बल 30 टक्क्यांनी वाढली आहे, अशी माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

30 टक्क्यांची वाढ

गुढीपाडवा हा शुभ दिवस मानला जात असल्याने या दिवशी नवीन वाहन खरेदी करण्यासाठी नागरिकांची पसंती असते. नागरिकांच्या वाढत्या उत्साहामुळे यंदा वाहन नोंदणीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल 20 हजार 57 वाहने अधिक खरेदी झाली आहेत. त्यामुळे राज्यात यंदा वाहन खरेदी 30 टक्क्यांनी वाढली आहे.

दुचाकी चारचाकीच्या खरेदीत मोठी वाढ

यामध्ये राज्यातचारचाकी वाहनांच्या खरेदीत देखील मोठी वाढ दिसून येत आहे. चारचाकी वाहनांच्या खरेदीत 28.84 टक्क्यांची वाढ झाली असून, यंदा एकूण 22 हजार 81 चारचाकी वाहने नोंदवली गेली आहेत. ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत 4 हजार 942 ने वाढली आहे. यासोबतच दुचाकी वाहन खरेदीतही 27.14 टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे. यावर्षी 51 हजार 756 दुचाकी वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दुचाकी वाहनांच्या खरेदीत 11 हजार 81 वाहनांची वाढ झाली आहे.

वाहन खरेदीत पुणेकर आघाडीवर!

दरम्यान, पुणे परिवहन कार्यालयांतर्गत सर्वाधिक 11 हजार 56 वाहनांची नोंदणी झाली. त्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड येथे 6 हजार 648, नाशिकमध्ये 3 हजार 626, मुंबई (मध्य) कार्यालयांतर्गत 3 हजार 154 आणि ठाणे परिवहन कार्यालयांतर्गत 3 हजार 107 वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *