मुंबई, 06 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (दि.06) 68 वा महापरिनिर्वाण दिन आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी येथे उपस्थित राहून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. याप्रसंगी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सदस्य नागसेन कांबळे आणि विविध नेते आणि अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी सध्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत.
https://x.com/ANI/status/1864865957145162113?t=yy4T1Zbg0OS8kDk3aQctAg&s=19
चैत्यभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दादरच्या चैत्यभूमीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, दीपक केसरकर, राहुल शेवाळे, मंगलप्रभात लोढा, कालिदास कोळंबकर, अमर साबळे, अमोल मिटकरी, राजकुमार बडोले, मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह इतर नेते आणि अधिकाऱ्यांनी भेट दिली. तसेच या कार्यक्रमात वरील मान्यवरांच्या उपस्थितीत माजी खासदार नरेंद्र जाधव यांच्या ‘भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
भारत संविधानाच्या मार्गानेच जगातील मोठी महाशक्ती बनू शकतो, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला. तसेच भारताच्या संविधानाअनुरूप आपले आचरण असेल असा संकल्प आपण केला पाहिजे. या संकल्पानेच आपण भारताला महाशक्ती बनवू शकतो. कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा महत्वाचे भारताचे संविधान असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग तळागाळातील लोकांना सशक्त करण्यासाठी केला आहे. बाबासाहेबांनी केवळ भारतातच नाही तर जगभरातील हक्कांना मानवी प्रतिष्ठेला वैचारिक संघटनात्मक बळ मिळवून दिले आहे. लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बल घटकांना सशक्त करण्याचा प्रयत्न सरकार म्हणून आम्ही करत आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेच्या कल्याणाचा मार्ग जगाला दाखवला. त्यांचे विचार व भारतीय संविधानाच्या आदर्शावर सरकारचा कारभार सुरू आहे. राज्यातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, याची आम्ही काळजी कायम घेतली आहे, असे ते यावेळी म्हणाले.