मुंबई, 24 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीने तब्बल 230 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ 48 जागा जिंकता आल्या. तसेच अपक्ष आणि इतर पक्षांना 12 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये भाजपने सर्वाधिक 130 जागांवर विजय मिळवला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 57 जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकून दाखवत कमाल केली आहे. दरम्यान, राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी 145 चा आकडा पार करणे आवश्यक असते. मात्र, यंदा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे राज्यात पुढील 5 वर्षांसाठी स्थिर सरकार येणार आहे. त्यामुळे राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
मविआ ला केवळ 48 जागा
तर दुसरीकडे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. यामध्ये महाविकास आघाडीला केवळ 48 जागांवर विजय झाला आहे. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक 20 जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर काँग्रेसला 16 जागांवर विजय मिळवता आला. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा आणि समाजवादी पार्टीला 2 जागा जिंकता आल्या. दरम्यान या पराभवामुळे महायुतीला मोठा धक्का बसला आहे.
पंतप्रधान मोदींनी मानले जनतेचे आभार
महायुतीच्या या विजयाबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. “विकासाचा विजय! सुशासनाचा विजय! एकजुट होऊन आपण आणखी मोठी भरारी घेऊ. ऐतिहासिक जनादेश दिल्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातील बंधू आणि भगिनींचे , विशेषतः राज्यातील युवक आणि महिलांचे मनःपूर्वक आभार. हे प्रेम आणि जिव्हाळा अतुलनीय आहे. जनतेला मी ग्वाही देतो की महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमची आघाडी यापुढेही काम करत राहील. जय महाराष्ट्र!,” असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
लाडकी बहीण योजना ठरली गेम चेंजर?
दरम्यान, महायुतीच्या या मोठ्या विजयाचे श्रेय राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांत सुरू केलेल्या अनेक योजनांना जाते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर महायुतीने त्यांची रणनीती पूर्णपणे बदलली. त्यावेळी राज्य सरकारने राज्यातील जनतेसाठी अनेक योजना सुरू केल्या. यामध्ये सरकारने महिला, शेतकरी, तरूण या घटकांसाठी विविध योजना राबविल्या. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ही योजना सुरू केल्यानंतर ती राज्यभरात राबविण्याचे आव्हान सरकारसमोर होते. परंतू, राज्य सरकारमधील भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांच्या नेत्यांनी एकत्रितपणे काम करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना घरोघरी पोहोचवली. तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेचा नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा हप्ता देण्यात महायुती सरकारला यश आले. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ राज्यातील 2 कोटींहून अधिक महिलांनी घेतला आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तसेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने त्यांच्या प्रचारात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे राज्यात ही योजनाच गेम चेंजर ठरली असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.