मुंबई, 05 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 जागांवरील निकाल हाती आले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार 30 जागांवर विजयी झाले. तर दुसरीकडे महायुतीला केवळ 17 जागा जिंकता आल्या. महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 13 जागा जिंकण्यात यश आले. तर भाजप 9 जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
कोणाला किती जागा?
2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसने 13 जागा जिंकल्या. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 9 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाने 8 जागांवर विजय मिळवला. तर दुसरीकडे महायुतीत भाजपला सर्वाधिक 9 जागा जिंकता आल्या. तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ एक जागा जिंकता आली.
पाहा गेल्या वेळेचे चित्र
दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीने तब्बल 48 पैकी 41 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपला सर्वाधिक 23 जागा आणि शिवसेनेने 18 जागांवर विजय मिळवला होता. मात्र, यावेळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला अपेक्षित असे यश मिळाले आहे. दरम्यान, फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला फटका बसला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जोरदार कमबॅक करत 13 जागा जिंकल्या आहेत. यावेळी काँग्रेसने गेल्या निवडणुकीत पराभव झालेल्या जवळपास सर्वच जागा जिंकल्या आहेत. दरम्यान गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकच जागा जिंकता आली होती. तसेच त्यावेळी राष्ट्रवादीला 5 जागा जिंकण्यात यश आले होते. तर एमआयएमला एका जागेवर विजय मिळवता आला होता.