शिष्टमंडळाला मोठे यश, जरांगे पाटलांनी उपोषण घेतले मागे

जालना, 02 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण आज मागे घेतले आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपले उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारकडे मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांनी सरकारला मराठा आरक्षण संदर्भात निर्णय घेण्यासाठी 2 जानेवारी पर्यंतची मुदत दिली आहे. तसेच राज्य सरकारला हा शेवटचा अल्टिमेटम असल्याचे जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले. आपला लढा संपलेला नाही आणि जोपर्यंत मराठा समाजातील सर्व लोकांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण लढत राहणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आमचा संघर्ष केवळ मराठवाड्यातील मराठ्यांसाठी नसून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आहे. असेही ते यावेळी म्हणाले. जर जानेवारी पर्यंत राज्यात सरसकट मराठा समाजाला आरक्षण लागू झाले नाही तर, राज्यात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र ,या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नव्हता.

भारताचा श्रीलंकेवर 302 धावांनी विजय

तत्पूर्वी, जरांगे पाटलांनी काल सायंकाळपासून पाणी पिणार नसल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर, सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची आज आंतरवली सराटी येथे भेट घेतली. यावेळी सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची तयारी असून त्यासाठी सरकारला वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी या शिष्टमंडळाने त्यांच्याकडे केली होती. तसेच घाईने घेतलेले निर्णय न्यायालयात टिकत नाहीत, त्यामुळे सरकारला वेळ देण्याची गरज आहे. असे त्यांनी म्हटले होते. यावेळी शिष्टमंडळातील न्यायमूर्तींनी मराठा आरक्षणातील कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. तर बराच वेळ चर्चा केल्यानंतर जरांगे पाटील यांनी त्यांची ही मागणी मान्य करीत आपले उपोषण सोडले. दरम्यान सरकारच्या शिष्टमंडळात दोन निवृत्त न्यायमूर्तींसह उदय सामंत, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, अतुल सावे या मंत्र्यांचा समावेश होता. याशिवाय आमदार बच्चू कडू देखील या शिष्टमंडळासोबत होते.

मुर्टी गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी!

यावेळी सरकारच्या विनंतीला मान देऊन उपोषण सोडल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांचे या सर्व मंत्र्यांनी आभार मानले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेतल्याबद्दल आभार मानले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

2 Comments on “शिष्टमंडळाला मोठे यश, जरांगे पाटलांनी उपोषण घेतले मागे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *