पुणे, 18 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती आजपासून 3 दिवस बंद राहणार आहेत. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी 18 ते 20 डिसेंबर या कालावधीत संप पुकारला आहे. या संपात ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे या काळात ग्रामपंचायत कामकाज ठप्प होणार आहे. याचा फटका गावकऱ्यांना बसणार आहे.
राज्यातील ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामरोजगार सेवक आणि कर्मचाऱ्यांनी आजपासून 3 दिवस संप पुकारला आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेने दिला आहे. या संपामुळे राज्यातील 27 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींचे कामकाज आजपासून 20 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांचे ग्रामपंचायतीमध्ये असलेले काम होणार नाही.
या आहेत प्रमुख मागण्या!
विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात येत आहे. यामध्ये ग्रामपंचायतींचे सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करावी तसेच त्यांचे थकीत मानधन तात्काळ देण्यात यावे, पेन्शन योजना लागू करावी, ग्रामपंचायत सदस्यांचे थकीत मानधन देण्यात यावे, ज्याप्रमाणे आमदार निधी दिला जातो त्याच धर्तीवर गावचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांना देखील निधी दिला जावा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसारखी वेतनश्रेणी लागू करावी यांसारख्या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. राज्य सरकारने या मागण्या मान्य कराव्यात, यासाठी राज्यातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.