पुणे, 05 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरातील नामांकित अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीची वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात समिती गठीत केली असून, याप्रकरणाची समितीकडून निष्पक्ष चौकशी केली जाणार आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1908149874912100462?t=YnLbe2fZJWf5Tdj2dxutXQ&s=19
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेत संवेदनशीलतेचा परिचय येत असल्याचे पाहायला मिळत आहे. हॉस्पिटलमधील काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय असंवेदनशीलतेने प्रसूतीला अलेल्या महिलेला दाखल करून घेण्यास नकार दिला किंवा अधिकचे पैसे मागितल्याचा विषय पुढे आला आहे. या प्रकरणामुळे लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे. यासंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती या घटनेची चौकशी करेल. शिवाय, अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून अतिशय कडक कारवाई करण्याचा आमचा मानस आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1908079206837182535?t=IN5zfx5CDz1JALt15dkljg&s=19
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया
सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने श्रीमती तनिषा भिसे या भगिनीचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल शासनाने घेतली आहे. आरोग्य विभागाने तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना ही चौकशी तातडीनं, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने आपली बाजू मांडली असली तरी केवळ एकतर्फी माहितीवर न भर देता सर्व घटकांचा विचार करूनच निर्णय घेण्यात येईल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
या घटनेविरोधात विविध संस्था, संघटना आणि नागरिकांनी आंदोलन छेडले असून त्यांची भावना शासनाने समजून घेतली आहे. चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या संवेदनशील घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व नागरिकांना संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असं आवाहन केले आहे. सरकार या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.