मुंबई, 26 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आज (दि.26) मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. या समारंभाची सुरूवात ध्वजारोहणाने झाली. त्यावेळी राधाकृष्णन यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या मार्गावर आदर्श दाखवणाऱ्या राष्ट्रपुरूष आणि समाजसुधारकांना अभिवादन केले.
सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती
प्रजासत्ताक दिनाच्या या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपालांच्या पत्नी सुमती, दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्याचे व्यापार व गुंतवणूक मंत्री जो झेकॅक्स, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्यासह विविध मंत्री, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, अधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
विविध पथकांकडून राज्यपालांना मानवंदना
प्रजासत्ताक दिनाच्या या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांनी प्रजासत्ताक दिन संचलनाचे निरीक्षण केले. विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली. राज्यपालांनी यावेळी राज्यातील जनतेला उद्देशून संबोधित केले. तसेच या कार्यक्रमानंतर राज्यपालांनी निमंत्रितांची भेट घेतली आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
संचलनाला उस्फुर्त प्रतिसाद
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये विविध सुरक्षा आणि सेवा पथकांनी भाग घेतला. भारतीय नौदल, गोवा पोलीस, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल, मुंबई पोलीस, अग्निशमन दल, वन विभाग, आणि इतर सुरक्षा दलांनी आपल्या शिस्तबद्ध संचलनाने उपस्थितांची वाहवा मिळवली. पथकांनी उत्कृष्ट वाद्यवृंद आणि पाईप बँड सादर केले, ज्याला लोकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
संचलनातून सांस्कृतिक महत्त्व
तसेच या संचलनात आयएनएस विक्रांत, नौसेनेचे पोत ‘सुरत’, पाणबुडी ‘वाघशीर’, तेजस फायटर जेट आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्र यांची प्रतिकृती देखील दाखवण्यात आली. याव्यतिरिक्त, ‘24 तासात अष्टविनायक दर्शन’, ‘आईच्या नावे एक झाड’, ‘वाघबारस’ आणि ‘अभिजात मराठी’ यासारख्या विविध चित्ररथांचा समावेश केला गेला, ज्यांनी विविध विभागांचे योगदान आणि संस्कृतीचे महत्व दाखवले.