मुंबई, 23 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) आयबीपीएस आणि एमपीएससीची राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व या दोन्ही परीक्षा 25 ऑगस्ट 2024 रोजी होणार होत्या. त्यामुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर, एमपीएससीची राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व पुढे ढकलण्याचा निर्णय लोकसेवा आयोगाने गुरूवारी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांची भूमिका रास्त आहे, मी विद्यार्थ्यांच्या भूमिकेसोबत आहे. राज्य सरकारने देखील विद्यार्थ्यांची भूमिका समजून घेत संवेदनशीलपणा दाखवावा, असे आवाहन रोहित पवारांनी केले आहे.
https://x.com/RRPSpeaks/status/1826531327056748821?s=19
https://x.com/RRPSpeaks/status/1826531327056748821?s=19
रोहित पवार काय म्हणाले?
एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा आयोगाचा निर्णय हा संवैधानिक मार्गाने रस्त्यावर उतरलेल्या तमाम विद्यार्थ्यांचा विजय आहे. परंतु हा निर्णय अर्धवट असून पुढे ढकलण्यात आलेल्या या परिक्षेमध्ये कृषीच्या राजपत्रित 257 जागांचाही समावेश झाला पाहिजे आणि संयुक्त गट-ब व गट-क ची जाहीरात काढण्याबाबतही ठोस निर्णय झाला पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. 25 ऑगस्ट रोजी होणारी राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे करण्यात आलेली आहे, पण ती कोणत्या महिन्यात घेण्यात येईल, हे आयोगाने घोषित करावे आणि त्यावर आचारसंहितेचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी. राज्यसेवेच्या याच जाहिरातीत कृषीच्या जागांचा समावेश करण्यात यावा, ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता द्यावी, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
गट-ब आणि गट-क जाहिरात कधी प्रसिद्ध होणार? रोहित पवारांचा सवाल
एकत्रित गट-ब आणि गट-क जाहिरात अजून प्रकाशित झालेली नाही. ती कोणत्या दिवशी प्रकाशित करण्यात येईल आणि साधारणतः त्याचा कालावधी एका महिन्याच्या आतच असावा. मुख्यमंत्र्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली, तर लगेच हा आंदोलनाचा प्रश्न सुटेल, असे रोहित पवार म्हणाले आहेत. एकीकडे शासनाच्या हजारो जागा रिक्त आहेत, दुसरीकडे आपल्या लाडक्या सहकाऱ्यांना फायदा व्हावा म्हणून नियमांना बाजूला सारून कंत्राटी भरती चा सपाटा लावला आहे. जर जागा रिक्त आहेत तर एकत्रितची जाहिरात का काढत नाहीत? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे.