सीरिया, 11 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) सीरियातील सध्याची बिकट परिस्थिती पाहता भारत सरकारने मंगळवारी (दि.10) रात्री 75 भारतीय नागरिकांना सीरियातून बाहेर काढले आहे. यामध्ये जम्मू-काश्मीरमधील 44 यात्रेकरूंचा देखील समावेश आहे. सर्व भारतीय नागरिक सुरक्षितपणे लेबनॉनला पोहोचले आहेत. तसेच हे सर्व भारतीय आता उपलब्ध व्यावसायिक विमानांनी भारतात परतत आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
https://x.com/MEAIndia/status/1866553977736741244?t=cvv2447H3ouHdOkKNLZe-A&s=19
सीरियात काय झाले?
दरम्यान, सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांची 50 वर्षांची सत्ता बंडखोरांनी संपुष्टात आणली. दोन दिवसांपूर्वी सीरियामध्ये बंडखोरांनी राजधानी दमास्कसचा ताबा घेतला. तसेच त्यांनी इतर अनेक प्रमुख शहरे आणि शहरे ताब्यात घेतली. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद हे देश सोडून पळून गेले आहेत. अशा परिस्थितीत सीरियामध्ये सध्या अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, सीरियातील ताज्या घडामोडीनंतर भारत सरकारने आता 75 भारतीय नागरिकांना सीरियातून सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. सीरियातील भारतीय नागरिकांच्या विनंतीनंतर आणि तेथील सुरक्षा परिस्थितीचे मूल्यांकन केल्यानंतर दमास्कस आणि बेरूतमधील भारतीय दूतावासाच्या देखरेखीखाली हे पाऊल उचलण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
भारत सरकार परदेशात भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत असून सीरियामध्ये असलेल्या उर्वरित भारतीय नागरिकांना दमास्कसमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचे देखील परराष्ट्र मंत्रालयाने यावेळी सांगितले आहे.