मुंबई, 01 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यानंतर दिलेल्या मुदतीत सरकार स्थापनेचा दावा करण्यात महायुतीला यश मिळाले नाही. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. तसेच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे. दरम्यान, राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा येत्या 5 डिसेंबर रोजी होणार आहे.
https://x.com/AUThackeray/status/1863112550185157021?t=_81wufkpoL01bJPUKLQK6Q&s=19
हा महाराष्ट्राचा अपमान: आदित्य ठाकरे
विधानसभेच्या निकालानंतर एक आठवडा उलटूनही मुख्यमंत्री निवडून सरकार बनवता न येणे हा महाराष्ट्राचा (आपल्या राज्याला इतक्या हलक्यात घेतल्याबद्दल) अपमानच नाही, तर त्यांच्या अत्यंत प्रिय निवडणूक आयोगाने दिलेल्या मदतीचाही अपमान आहे, असे आदित्य ठाकरे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. असे दिसून आले आहे की नियम फक्त विरोधी पक्षांना लागू होतात, तर काही विशिष्ट पक्षांना नियम लागू होत नाहीत. सरकार स्थापनेचा दावा न करता आणि माननीय राज्यपालांना संख्याबळ न दाखवता एकतर्फी शपथविधीची तारीख जाहीर करणे म्हणजे शुद्ध अराजकता आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री सुट्टीवर!
तसेच या सगळ्यात काळजीवाहू मुख्यमंत्री हे सुट्टीवर गेले आहेत, असे देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. यादरम्यान सरकार स्थापन करणाऱ्यांसाठी महाराष्ट्राला प्राधान्य नाही. ते त्यांच्या दिल्ली भेटीचा आनंद घेत आहेत. राष्ट्रपती राजवट? ते आत्तापर्यंत असायला हवे होते ना? निर्णय प्रलंबित असताना विरोधकांकडे संख्याबळ असते तर असे झाले नसते का? असे सवाल देखील आदित्य ठाकरे यांनीq केले आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांनी या पोस्टमधून नवीन मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. असं असलं तरी, निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे अखेरीस ज्याला शपथ दिली जाईल त्याचे आमचे अभिनंदन, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.