जालना, 21 जून: (विश्वजीत खाटमोडे) ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे सध्या आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. त्यामुळे या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची वडीगोद्री गावात जाऊन भेट घेतली. यावेळी सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्याकडे उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
https://x.com/SandipanBhumare/status/1804038791621153100?s=19
https://x.com/girishdmahajan/status/1804039972867182697?s=19
उपोषण मागे घेण्याची विनंती
राज्य सरकारच्या या शिष्टमंडळात ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत, गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार गोपीचंद पडळकर आदी नेते उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, ही सरकारची भूमिका असून या भूमिकेत कधीही बदल होणार नाही, असा विश्वास यावेळी गिरीश महाजन यांनी आंदोलकांना दिला. सरकारच्या या भूमिकेवर विश्वास ठेवून उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावे, तसेच महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती यावेळी गिरीश महाजन यांनी त्यांना केली.
काय आहेत त्यांच्या मागण्या?
इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याचे लेखी आश्वासन राज्य सरकारने द्यावे. राज्य सरकारने ओबीसी आणि सगेसोयरे संदर्भातील त्यांची भूमिका स्पष्ट करावी. तसेच राज्यभरात सध्या कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे, त्याला राज्य सरकारने स्थगिती द्यावी आणि देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे सध्या बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे त्यांच्या या मागण्यांवर राज्य सरकार काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.