गोपीचंद पडळकर चप्पलफेक प्रकरण; इंदापूर तालुका बंदची हाक

इंदापूर, 11 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पलफेक केल्याच्या निषेधार्थ आज इंदापूर शहरासह इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. सकल ओबीसी समाजाच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला आहे. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि हॉटेल्स बंद करण्याचे आवाहन सकल ओबीसी समाजाने केले आहे. या बंदला इंदापूर शहरात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानूसार, इंदापूर शहरातील दुकाने आज सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली आहेत.



गोपीचंद पडळकर यांच्यावर ज्यांनी चप्पलफेक केली त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज इंदापूर शहर आणि तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्याठिकाणी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पलफेक केल्याप्रकरणी 10 ते 15 जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या दोन दिवसांपूर्वी इंदापूर शहरातील ओबीसी एल्गार सभेला आले होते. यावेळी सभा आटोपल्यानंतर गोपीचंद पडळकर हे बाजूलाच असलेल्या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या उपोषण स्थळी भेट देण्यासाठी गेले होते. मात्र त्याच्याच शेजारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू होते.

त्यावेळी दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या उपोषण स्थळाला भेट देण्यासाठी जात असताना गोपीचंद पडळकर यांना मराठा आंदोलकांनी विरोध केला. यादरम्यान गोपीचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पलफेक करण्याचा प्रकार घडला. तर दुसरीकडे ही चप्पलफेक आम्ही केली नसून, गोपीचंद पडळकर यांच्यावर त्यांच्याच माणसांनी चप्पलफेक केल्याचे मराठा आंदोलकांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *