राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास सुरूवात

मुंबई, 15 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळण्यास बुधवारपासून (दि.14) सुरूवात झाली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळून 3000 रुपयांचा पहिला हप्ता दिला जाणार आहे. त्यानुसार, आतापर्यंत राज्यातील एकूण 80 लाख पात्र महिलांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

https://x.com/iAditiTatkare/status/1823962244050510316?s=19

80 लाख महिलांना मिळाले पैसे

यामध्ये 14 ऑगस्ट रोजी 32 लाख पात्र महिलांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा झाला आहे. तसेच आज पहाटे 48 लाख महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला व बालविकास विभाग 24 तास कार्यरत आहे. या प्रक्रियेवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे. सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतर करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर कार्यरत आहोत, असे मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.

1 कोटी 64 लाखांहून अधिक अर्ज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आतापर्यत 1.64 कोटींहून अधिक महिलांनी त्यांचा अर्ज दाखल केला आहे. यामधील 1.36 कोटी महिलांचे अर्ज पात्र झाले आहेत. तर उर्वरित महिलांच्या अर्जांची सध्या पडताळणी सुरू आहे. दरम्यान या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेसाठी 21 ते 65 वयोगटातील महिला अर्ज करू शकतात. ज्या महिलांनी अद्यापही अर्ज दाखल केलेला नाही, अशा महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज दाखल करावा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *