पंढरपूर, 18 मे: (विश्वजीत खाटमोडे) वारकरी आणि विठ्ठल भक्तांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. येत्या 2 जूनपासून भाविकांना आपल्या लाडक्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. या संदर्भातील माहिती पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर यांनी आज दिली आहे. दरम्यान, मंदिराच्या संवर्धनाच्या कामासाठी 15 मार्च 2024 पासून पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन कधी सुरू होणार? याची वाट भाविक पाहत होते. अखेर विठुरायाचे पदस्पर्श दर्शन आता लवकरच सुरू होणार आहे.
https://twitter.com/ddsahyadrinews/status/1791785637009342935?s=19
2 जूनपासून मंदिर दर्शनासाठी खुले
या संदर्भात पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. येत्या 7 जुलै पासून विठ्ठलाचे आषाढी एकादशीसाठी 24 तास दर्शन सुरू राहणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे काम अतिशय जोमाने सुरू असून, हे काम अजून 17 ते 18 महिने सुरू राहणार आहे. परंतु विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहाचे आणि चार खांबांच्या संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या 2 जूनपासून विठ्ठल मंदिर पूर्वीप्रमाणे दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे, असे मंदिर समितीचे सहअध्यक्ष म्हणाले आहेत.
7 जुलैपासून 24 तास दर्शन
2 जून रोजी सकाळी पांडुरंगाची नित्यपूजा चालू केली जाणार आहे. तसेच 2 ते 9 जून या कालावधीत विठ्ठल-रुक्मिणीची ओटीपूजा करण्यात येणार आहे. याशिवाय 2 जूनपासून देवाच्या सर्व पूजा पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती देखील पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर यांनी आज दिली. येत्या 7 जुलैपासून विठ्ठलाचे आणि माता रुक्मिणीचे दर्शन 24 तास सुरू राहणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे विठ्ठल भक्तांमध्ये सध्या आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे.