राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी! मान्सूनचे तळ कोकणात आगमन

पुणे, 06 जून: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आज मान्सूनचे आगमन झाले आहे. यासंदर्भातील माहिती हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक होसाळीकर यांनी दिली आहे. मान्सून आज तळ कोकणात दाखल झाला आहे. तसेच मान्सून आता रत्नागिरी, सोलापूर, पुढे मेडक, भद्राचलम, विजयनगरम, बंगालच्या खाडी आणि इस्लामपूरपर्यंत पोहोचला असल्याची माहिती होसाळीकर यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान, मान्सून आज दाखल झाल्यानंतर तळ कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पावसाला सुरूवात झाली आहे.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1798605109733294086?s=19

जनतेला मोठा दिलासा

तत्पूर्वी, मान्सून 30 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून 4 जूनला गोवा कर्नाटक आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये पोहोचला होता. त्यानंतर मान्सून दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरला आहे. त्यानुसार, मान्सून आज महाराष्ट्रातील तळ कोकणात दाखल झाला आहे. त्यामुळे दुष्काळात होरपळत असलेल्या राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1798556191741862029?s=19

मान्सून संपुर्ण महाराष्ट्रात कधी येणार?

मान्सून सध्या तळ कोकणात पोहोचला असून, तो संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? याची सध्या शेतकरी आणि नागरिक वाट पाहत आहेत. दरम्यान, मान्सून येत्या 24 ते 48 तासांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे संपुर्ण राज्यात मान्सूनचा पाऊस कधी पडणार? याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. तत्पूर्वी, राज्यातील बहुतांश ठिकाणचे तापमान सध्या 40 अंश सेल्सिअसच्या घरात आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अनेक गावांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत आहे. याशिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, यंदा जास्त पाऊस पडावा, अशी अपेक्षा राज्यातील जनतेकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *