शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता! मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल

दिल्ली, 19 मे: (विश्वजीत खाटमोडे) शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. मान्सून आज अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. या संदर्भातील माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरवर्षी मान्सून हा साधारणपणे 22 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचतो. परंतु यावेळी तो 19 मे रोजी म्हणजेच लवकर दाखल झाला आहे. मान्सूनचा असाच वेग कायम राहिल्यास मान्सून वेळे आधीच केरळमध्येही दाखल होईल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, यंदा केरळमध्ये 31 मे पर्यंत मान्सून दाखल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

https://twitter.com/RMC_Mumbai/status/1792087503366725768?s=19

मान्सून अंदमान निकोबार बेटांवर

मान्सून आज अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर पोहोचला आहे. समाधानकारक परिस्थिती लक्षात घेता नैऋत्य मान्सून मालदीव आणि कोमोरिन क्षेत्राच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात आज दाखल झाला. या पार्श्वभूमीवर, गेल्या 24 तासांत निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाने आज दिली आहे.

या राज्यांना रेड अलर्ट

तत्पूर्वी, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि माहे येथे आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यानुसार तेथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात हवामान विभागाने देशात यंदा मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता. देशात यंदा सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे देशातील अनेक राज्यांत उन्हाचा कडाका चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. अशातच मान्सूनची समाधानकारक बातमी आल्यामुळे नागरिकांना लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *