यवतमाळ, 28 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज यवतमाळ येथील एका कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना 6 हजारांचा होणार लाभ
दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा हप्ता मिळतो. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा हप्ता मिळत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 16 व्या हप्त्याचे प्रत्येकी 2000 रुपये, त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे प्रत्येकी 4000 रुपये, असे मिळून एकूण प्रत्येकी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.
88 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा!
राज्यातील सुमारे 88 लाख लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात ही रक्कम थेट जमा होणार आहे. तर केंद्र सरकारने 28 फेब्रुवारी 2024 हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह विविध मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.