मुंबई, 09 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे एकूण 3000 रुपये जमा होतील, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत दिली होती. त्यानंतर काल (दि.08) महिला दिन मोठ्या उत्साहात पार पडला. परंतु, लाडकी बहीण या योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात फक्त एकाच महिन्याचे 1500 रुपये जमा झाले. तर काही महिलांच्या बँक खात्यात एकही हप्ता जमा झाला नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
https://x.com/iAditiTatkare/status/1898411591210586302?t=7uNUEYczV3WRVtAoqYzLxQ&s=19
आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
या पार्श्वभूमीवर, मंत्री आदिती तटकरे यांनी आता महत्त्वाची माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे एकूण 3000 रुपये येत्या 12 मार्चपर्यंत मिळतील, असे त्यांनी सांगितले आहे. यासंदर्भात आदिती तटकरे यांनी ट्विट केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता वितरीत करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्चपासून सुरू झाली असल्याचे आदिती तटकरे यांनी यामध्ये सांगितले आहे.
12 मार्चपर्यंत पैसे मिळणार!
तसेच ही प्रक्रिया दिनांक 12 मार्चपर्यंत सुरू राहणार असून, सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे दोन टप्प्यात एकूण 3000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थी महिलांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून, याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे!, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 12 मार्चपर्यंत 3000 रुपये मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.