गोंदिया, 30 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात शुक्रवारी (दि.29) झालेल्या बस अपघातात आणखी 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 11 वर पोहोचली आहे, तर 34 जण जखमी झाले आहेत. गोंदिया-अर्जुनी मार्गावरील बिंद्रवन टोला गावाजवळ शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस उलटून हा अपघात झाला. या अपघातवेळी नागपूरहून गोंदियाला जाणाऱ्या या बसमध्ये 40 हून अधिक प्रवाशी प्रवास करीत होते.
https://x.com/ANI/status/1862466845665845486?t=cCWwfZ69cIPETnNUpOg35w&s=19
हा अपघात झाल्यानंतर सुरूवातीला 7 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, नंतर मृतांची ही संख्या 11 वर पोहोचली. यावेळी गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या अपघातात 34 जण जखमी झाले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांपैकी काहीजण नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदियाचे रहिवासी आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. “महाराष्ट्रातील गोंदिया येथे बस अपघातात लोकांचा मृत्यू झाल्याने मला दु:ख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करीत आहे. जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. स्थानिक प्रशासन बाधित लोकांना मदत करत आहे. प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तसेच जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत, असे ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे. तत्पूर्वी, राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. तसेच जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.