पुणे, 25 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. या निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. यादरम्यान पुण्यातील सहकारनगर परिसरात पोलिसांनी 138 कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांनी निवडणूक आयोग आणि इन्कम टॅक्स विभागाला दिली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
सहकारनगर परिसरात कारवाई
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून सध्या पुणे शहरात जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. या नाकाबंदीदरम्यान संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांनी आज (दि.25) सकाळी आठच्या सुमारास सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पद्मावती परिसरात एका टेम्पोची झडती घेतली. तेंव्हा पोलिसांना या टेम्पोत काही बॉक्समध्ये सोन्याचे दागिने असल्याचे आढळून आले. या दागिन्यांची किंमत 138 कोटी रुपये आहे. त्यावेळी टेम्पो चालकाने हे दागिने मुंबईहून पुण्यात आणले असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी हे सोने आणि हा टेम्पो जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी या दागिन्यांची माहिती निवडणूक आयोग आणि इन्कम टॅक्स विभागाला कळवली. दरम्यान, हे दागिने कोणाचे होते? ते कोठून आणले? याची चौकशी सध्या इन्कम टॅक्स विभाग करीत आहे.
यापूर्वी रोकड जप्त केली होती
यापूर्वी, पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूर येथील टोल नाक्यावर एका खासगी वाहनातून राजगड पोलिसांनी 5 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील हडपसर परिसरात एका व्यावसायिकाकडून 22 लाखांहून अधिक रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली होती. या रक्कमेचा देखील निवडणूक आयोग आणि इन्कम टॅक्स विभागाकडून तपास केला जात आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या अनेक घटना सध्या समोर येत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.