पुणे, 17 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात येत्या 20 तारखेला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी राज्यभरातील रस्त्यांवर जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. या नाकाबंदीदरम्यान जळगाव शहरात करोडो रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. याची माहिती जळगावचे पोलीस उपनिरीक्षक संदीप गावित यांनी आज (दि.17) एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.
https://x.com/ANI/status/1858116706490867942?t=k0wyzb2rFzG5UfQhJu0hyA&s=19
पोलिसांनी दिली माहिती
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यावेळी पोलिसांना सोन्या-चांदीची वाहतूक करणारे एक चारचाकी वाहन आढळून आले. पोलिसांनी या वाहनाला रोखले आणि त्याची तपासणी केली. या कारवाईत पोलिसांनी 5 कोटी 59 लाख रुपयांचे सोने आणि चांदी जप्त केली आहे. जळगाव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी हे जप्त करण्यात आलेले सोने आणि चांदी भरारी पथकाकडे सुपूर्द केले आहे. तर हे सोने आणि चांदी कोणाची आहे? ते कोठे नेण्यात येत होते? या सर्व बाबींचा तपास सध्या भरारी पथक करीत आहे, असे पोलीस उपनिरीक्षक संदीप गावित यांनी सांगितले आहे.
550 कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता जप्त
दरम्यान, राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीच्या वातावरणात गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणेची राज्यभरात भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून ते आतापर्यंत 550 कोटींहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये बेकायदा पैसे, दारू, ड्रग्स, सोने, चांदी यांसारखे मौल्यवान धातू आदी वस्तूंचा समावेश आहे.