वालचंदनगर, 26 मार्च: पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि वालचंदनगर येथे शेळी चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. इंदापूर आणि वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून शेळी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी तपास करून आरोपींना पकडण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस फौजदार बाळासाहेब कारंडे, हवालदार अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, निलेश शिंदे हे इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार स्वप्नील अहिवळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, वालचंदनगर व इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतील शेळी चोरी करणारी टोळी आंबळे रेल्वे स्टेशन येथून कॉपर वायर चोरून इंदापूर तालुक्यातील वरकुटे येथे तलावाजवळ थांबली आहे.
सापळा रचून कारवाई
सदर माहितीच्या आधारे पोलीस पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली असता, तेथे पाच जण काहीतरी जाळत बसले होते. पोलिसांची चाहूल लागताच ते पळू लागले. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून रोहित दत्तात्रय कटाळे (वय 20, रा. उरळी कांचन, पुणे) याला पकडले. चौकशीत त्याने साथीदारांची नावे सांगितली. साहिल विलास चौधरी (वय 20, रा. उरळी कांचन, पुणे), वैभव ऊर्फ गोट्या तरंगे (रा. उरळी कांचन, पुणे), सचिन अरुण कांबळे (रा. उरळी कांचन, पुणे), खंडू महाजन (रा. वडापुरी, इंदापूर, पुणे) अशी त्यांची नावे आहेत.
11 गुन्हे उघड
तसेच या टोळीने मारूती सुझुकी सुपर कॅरी (MH-42-BF-6089) या वाहनाचा वापर करून वालचंदनगर, इंदापूर आणि यवत भागात अनेक ठिकाणी शेळी चोरी केल्याची कबुली दिली. सोबतच या चौकशीत वालचंदनगर, इंदापूर आणि यवत पोलीस स्टेशन हद्दीतील 11 गुन्हे उघड झाले. यामध्ये या आरोपींनी अनेक वेळा शेळ्या व बोकड चोरल्याचे समोर आले आहे.
दोन आरोपींना अटक
रोहित कटाळेच्या मदतीने साहिल चौधरी याला उरळी कांचन येथे अटक करण्यात आली. याप्रकरणी त्यांच्या विरोधात वालचंदनगर पोलीस ठाण्यात बीएनएसच्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना 25 मार्च रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. तर सदर गुन्ह्यातील आरोपी वैभव तरंगे याच्यावर पुणे शहर आणि पुणे ग्रामीणमध्ये चोरीचे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. तसेच आरोपी रोहित कटाळे याच्यावर दौंड पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा एक गुन्हा दाखल आहे. तर बाकीच्या आरोपींचा सध्या तपास सुरू आहे.