इतकी तत्परता पाहून आनंद झाला… पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर संजय निरूपम यांची प्रतिक्रिया

मुंबई, 04 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) काँग्रेसने पक्षाचे बंडखोर नेते संजय निरूपम यांच्यावर कडक कारवाई केली आहे. काँग्रेसने काल रात्री संजय निरूपम यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली होती. त्यानंतर संजय निरूपम यांनी काँग्रेस पक्षाच्या या कारवाई संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. मी काल रात्रीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच त्यांनी माझी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. एवढी तत्परता पाहून आनंद झाला असल्याचे संजय निरूपम यावेळी म्हणाले. तसेच आज पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करणार असल्याची माहिती देखील संजय निरूपम यांनी या ट्विट मधून दिली आहे. त्यामुळे संजय निरूपम हे आज काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://twitter.com/sanjaynirupam/status/1775721299416932499?s=19

काँग्रेस पक्ष नेतृत्वावर टीका केली होती

तत्पूर्वी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी चार जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते. यामध्ये संजय निरूपम यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवायची होती. मात्र, या जागेवर शिवसेनेने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे संजय निरूपम हे नाराज झाले होते. त्यानंतर संजय निरूपम यांनी महाविकास आघाडीचे नेते यांसह काँग्रेस नेतृत्वावर देखील टीका केली होती. मुंबईतील काँग्रेसला संपवण्यासाठी हा निर्णय आहे. या निर्णयाचा मी निषेध करतो. उद्धव ठाकरे यांनी एकतर्फी उमेदवार जाहीर करून युती धर्म पाळला नाही. काँग्रेस नेतृत्वाने शिवसेनेसमोर झुकण्याची परवानगी देऊ नये, असे संजय निरूपम यावेळी म्हणाले होते. सोबतच त्यांनी उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यास विरोध दर्शवला होता.

कोणत्या पक्षात प्रवेश करणार?

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर संजय निरूपम हे आता कोणत्या पक्षात जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय निरूपम हे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अशा परिस्थितीत संजय निरूपम यांच्याकडे आता भाजप किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पक्षांचे पर्याय शिल्लक आहेत. दरम्यान, संजय निरूपम हे शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. तसेच संजय निरुपम यांना शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघातून अमोल किर्तीकर यांच्या विरोधात उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे संजय निरूपम हे कोणत्या पक्षात जाणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *