मुंबई, 14 मे: (विश्वजीत खाटमोडे) मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपर परिसरातील पेट्रोल पंपाच्या छतावर काल सायंकाळी एक भलेमोठे लोखंडी होर्डिंग कोसळण्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये 74 जण जखमी आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी 31 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
https://twitter.com/ANI/status/1790218605457744110?s=19
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत
या दुर्घटनेनंतर काल सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफच्या दोन तुकड्या सध्या घटनस्थळी उपस्थितीत आहे. त्यांच्याकडून सध्या हे होर्डिंग हटविण्याचे काम सुरू आहे. एनडीआरएफचे सहाय्यक कमांडंट निखिल मुधोळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. याठिकाणी पेट्रोल पंप असल्यामुळे येथे कटींगचे उपकरण वापरण्यास समस्या येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/rashtrapatibhvn/status/1790066594212626882?s=19
राष्ट्रपतींनी शोक व्यक्त केला
दरम्यान या घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. “मुंबईतील घाटकोपर परिसरात होर्डिंग पडून अनेकांचा बळी गेल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी शोकसंतप्त कुटुंबातील सदस्यांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करते. मी जखमी लोकांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करते आणि मदत आणि बचाव कार्य यशस्वी होण्यासाठी कामना करते,” असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.