घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमध्ये अटक, आज पहाटे मुंबईत आणले

उदयपूर, 17 मे: (विश्वजीत खाटमोडे) घाटकोपर परिसरात झालेल्या होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणातील मुख्य आरोपी ईगो मीडिया कंपनीचा मालक भावेश भिडे याला काल रात्री राजस्थानमधून अटक केली. त्याला आज मुंबईत आणण्यात आले आहे. मुंबईत 13 मे रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी जोरदार वादळामुळे घाटकोपर परिसरातील पेट्रोल पंपावर एक मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत 16 लोकांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातानंतर भावेश भिंडे फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडे याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता.

https://twitter.com/ANI/status/1791120859601777126?s=19

दुर्घटनेनंतर फरार झाला होता 

दरम्यान, ईगो मीडिया लिमिटेड या जाहिरात कंपनीचा मालक भावेश भिंडे हा राजस्थानच्या उदयपूर येथील एका रिसॉर्टमध्ये लपून बसला होता. तो गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता. या घटनेनंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर पोलिसांना त्याचा शोध लागला. भावेश भिंडे याला काल रात्री मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने उदयपूर येथून अटक केली. त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे मुंबईत आणले आहे. याप्रकरणी पोलीस त्याची आता चौकशी करणार आहेत.

https://twitter.com/ANI/status/1791260874445140201?s=19

सुमारे 66 तास बचावकार्य

तत्पूर्वी, घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर 120 स्क्वेअर फूट आकाराचे बेकायदा लोखंडी होर्डिंग लावण्यात आले होते. या होर्डिंगच्या पिलरचा पाया अत्यंत कमकुवत असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. होर्डिंगचा पाया जास्त खोल नसल्याचे सांगितले जात आहे. या कमकुवत पायामुळे हा अपघात झाला. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला. तर यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. त्यापैकी 42 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर सुमारे 66 तास बचावकार्य सुरू होते. सध्या हे बचावकार्य पूर्ण झाले आहे. मात्र होर्डिंग हटविण्याचे काम अद्याप सुरू आहे. यावेळी ढिगाऱ्यातून अनेक वाहने बाहेर काढण्यात आली आहेत. याठिकाणी चालू पेट्रोल पंप असल्याने या कामाला उशीर लागत असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *