घाटकोपर, 02 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) घाटकोपर परिसरात कॅब चालकावर हल्ला केल्याप्रकरणी एका पत्रकाराला न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ऋषभ चक्रवर्ती असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून, तो व्यवसायाने पत्रकार आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 115, 117, 351(2) आणि 352 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कॅब चालक कयामुद्दीन मोईनुद्दीन कुरेशी यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
https://x.com/ANI/status/1830301267333185675?s=19
अशी घडली घटना
त्यानंतर पोलिसांनी ऋषभ चक्रवर्तीला अटक केली, तसेच त्याला रविवारी (दि.01) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने ऋषभ चक्रवर्ती याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी घाटकोपरमधील असल्फा गावाजवळ ऋषभ चक्रवर्तीने त्याच्या कारने कॅबला धडक दिली होती. त्यानंतर या कॅब चालकाने त्याला थांबवले. तसेच त्याच्याकडे वाहनाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मागितली. परंतु ऋषभ चक्रवर्ती याने त्याकडे दुर्लक्ष करून तेथून पळ काढला. त्यानंतर या कॅब चालकाने ऋषभ चक्रवर्तीच्या कारचा पाठलाग केला. तसेच ते पाठलाग करीत घाटकोपर येथील एलबीएस मार्गावरील त्यांच्या निवासस्थानाजवळ पोहोचले. त्यावेळी ऋषभ चक्रवर्तीने जेव्हा त्याची कार थांबवली तेव्हा कॅब चालकाने ऋषभ चक्रवर्तीच्या कारला पाठीमागून धडक दिली.
कॅब चालक गंभीर जखमी
या घटनेनंतर ऋषभ चक्रवर्तीने कॅब चालक कयामुद्दीन मोईनुद्दीन कुरेशी यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच त्याने या कॅब चालकाला उचलून खाली जमिनीवर आदळले. अशी माहिती पार्कसाईट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस अधिकारी संतोष घाटेकर यांनी दिली. या मारहाणीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले होते. या घटनेत संबंधित कॅब चालक गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तत्काळ जेजे रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलीस करीत आहेत.