काँग्रेसला सोडचिठ्ठी देत गौरव वल्लभ यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली, 04 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर गौरव वल्लभ यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात गौरव वल्लभ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप नेते विनोद तावडे यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. दरम्यान, गौरव वल्लभ यांनी आज सकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता. त्यांच्यासोबत बिहार काँग्रेसचे नेते अनिल शर्मा आणि आरजेडी नेते उपेंद्र प्रसाद यांनी देखील यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

https://twitter.com/ANI/status/1775787933947285788?s=19

गौरव वल्लभ यांनी काय म्हटले?

तत्पूर्वी, गौरव वल्लभ यांनी आज काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या आधी सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केले होते. या पत्रात त्यांनी त्यांचे सर्व मुद्दे आणि विचार मांडले आहेत. आज काँग्रेस पक्ष ज्या दिशाहीन वाटेने पुढे जात आहे, त्यात मला काही सोयरसुतक नाही. मी सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही किंवा सकाळ संध्याकाळ देशाची संपत्ती निर्माण करणाऱ्यांना शिवीगाळ करू शकत नाही. म्हणूनच मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे गौरव वल्लभ यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

कोण आहेत गौरव वल्लभ?

गौरव वल्लभ यांनी 2019 मध्ये सर्वप्रथम काँग्रेस पक्षाकडून झारखंडमधील जमशेदपूर पूर्व येथून विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना 18 हजारांहून अधिक मते मिळाली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2023 मध्ये त्यांनी राजस्थानमधील उदयपूरमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. परंतु, या निवडणुकीत देखील भाजपचे उमेदवार तारचंद्र जैन यांनी त्यांचा 32000 मतांनी पराभव केला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अनेक नेते पक्षाचा राजीनामा देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, अशोक चव्हाण, संजय निरूपम या बड्या नेत्यांचा समावेश आहे. त्याचा फटका येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *