महिन्याच्या सुरूवातीला गॅस सिलिंडरच्या दरात वाढ! पहा नव्या किमती

दिल्ली, 01 सप्टेंबर: (विश्वजीत खाटमोडे) सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला जनतेला महागाईचा झटका बसला आहे. विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत आज (रविवारी) बदल केला आहे. त्यानुसार, 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 39 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आजपासून (दि. 01 सप्टेंबर) लागू होणार आहे. तर याच्याआधी गेल्या ऑगस्ट महिन्यात देखील व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली होती. तेंव्हा 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर 8.50 रुपयांनी महागला होता.

https://x.com/ANI/status/1829953513998467474

पहा नवीन किमती

19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 39 रुपयांनी वाढ करण्यात आल्यामुळे देशभरातील विविध शहरांतील गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल झालेला आहे. त्यानुसार, दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1691.50 रुपये इतकी झाली आहे. दिल्लीत यापूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 1652.50 रुपये होते. तसेच मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1605 रुपयांवरून 1644 रुपयांवर पोहोचली आहे. कोलकात्यात ही किंमत 1764.50 रुपयांवरून 1802.50 रुपयांपर्यंत वाढली आहे. तर चेन्नईमध्ये या गॅस सिलिंडरची किंमत 1817 रुपयांवरून 1855 रुपये इतकी झाली आहे.

घरगुती गॅसचे दर स्थिर!

दरम्यान तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली असली तरी, मात्र 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. यापूर्वी, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल 9 मार्च 2024 रोजी करण्यात आला होता. त्यावेळी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. तेंव्हापासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर आहेत. त्यानुसार, मुंबईत सध्या 14 किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 802.50 रुपये, दिल्लीत 803 रुपये, कोलकात्यात 829 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *