मुंबई, 25 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील सायन कोळीवाडा येथील अँटॉप हिल परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना सध्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
https://x.com/ANI/status/1783331108224147810
अँटॉप हिल परिसरातील घटना
सायन कोळीवाडा परिसरातील अँटॉप हिल भागात ही घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास याठिकाणी 2 स्फोट झाले. हा स्फोट इतका भीषण होता की, त्यामुळे या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाने ही आग विझवली. सायन कोळीवाड्यातील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
https://twitter.com/ani_digital/status/1781803239425392727?s=19
काही दिवसांपूर्वी आगीची घटना घडली होती
दरम्यान, मुंबईत गेल्या काही काळापासून आगीच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील सानपाडा येथील एका निवासी इमारतीच्या नवव्या मजल्यावर अचानकपणे आग लागली होती. शनिवारी रात्री ही घटना घडली होती. या आगीच्या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी या ठिकाणी लागलेली आग आटोक्यात आणली.