पुणे, 04 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एका 19 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील कोरेगाव येथे घडली. अमोल पोटे (वय 25) आणि किशोर काळे (वय 29) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना न्यायालयाने 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
https://x.com/ani_digital/status/1896699557364572633?t=4FHHsSWGLMMD67Obpula9w&s=19
अशी घडली घटना
पीडित तरूणी आणि तिचा मामेभाऊ शनिवारी (दि.28) रात्री कोरेगाव येथील रस्त्याच्या बोलत असताना हे दोघे आरोपी दुचाकीवरून आले. त्यांनी पीडित तरूणी आणि तिच्या मामेभावाला धारदार शस्त्राचा धाक दाखवत धमकावले आणि जबरदस्तीने या दोघांना शरीरसंबध ठेवण्यास भाग पाडले. याचा व्हिडीओ देखील आरोपींनी रेकॉर्ड केला. त्यानंतर या दोन्ही आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला आणि तिचे 10 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले.
आरोपींना तत्काळ अटक
दरम्यान, पीडितेने आणि तिच्या मामेभावाने घडलेला हा प्रकार त्यांच्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आणि रविवारी (दि.01) पहाटे काही तासांतच दोघा आरोपींना अटक केली. आरोपींकडून मोबाईल आणि चोरलेले सोने जप्त करण्यात आले असून, आरोपींवर सामूहिक बलात्कार आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे, असे रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.
यापूर्वी स्वारगेट बसस्थानकात तरूणीवर अत्याचार
तर याच्याआधी काहीच दिवसांपूर्वी स्वारगेट बसस्थानक परिसरातील एसटी बसमध्ये एका 26 वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. ही घटना 25 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी दत्तात्रय रामदास गाडे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी आहे. दरम्यान, या दोन्ही घटनांमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.