गडचिरोली, 02 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि.01) गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. यावेळी बक्षीस घोषित असलेल्या 11 नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना लोकशाही मूल्यांवरील विश्वास दृढ व्हावा यासाठी संविधानाची प्रत भेट देण्यात आली. तसेच पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडून 86 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.
https://x.com/CMOMaharashtra/status/1874466766455529659?t=_vR-rMNe72wGu9iJ02htIQ&s=19
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावे
आत्मसमर्पण नक्षलवाद्यांमध्ये विमला चंद्रा सिडाम उर्फ तारक्का (25 लाख रुपये बक्षीस), सुरेश बैसाखी उईके आणि त्यांची पत्नी कल्पना गणपती तोरेम (32 लाख रुपये एकत्रित बक्षीस), अर्जुन तानू हिच्चामी आणि त्यांची पत्नी सम्मी पांडू मट्टामी (22 लाख रुपये एकत्रित बक्षीस), वनिता सुकलू धुरवे (6 लाख रुपये बक्षीस), निशा बोडका हेडो (6 लाख रुपये बक्षीस), श्रुती उलगे हेडो (4 लाख रुपये बक्षीस), शशिकला पतिराम धुरवे (2 लाख रुपये बक्षीस), सोनी सुक्कू मट्टामी (2 लाख रुपये बक्षीस) आणि आकाश सोमा पुंगाटी (2 लाख रुपये बक्षीस) यांचा समावेश आहे.
https://x.com/CMOMaharashtra/status/1874523052555514091?t=EjZENFJbMbDYJ9Is6BqjUw&s=19
विविध विकासकामांचा शुभारंभ
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यात विविध विकासकामांचा शुभारंभ देखील करण्यात आला. स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतर प्रथमच अहेरी-गर्देवाडा बससेवा सुरू करण्यात आली. लॉईड्सच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ करत 6,200 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 9,000 रोजगार उपलब्ध करून देण्यात आले. कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे 1,000 कोटी रुपयांचे समभाग प्रदान करण्यात आले.
याशिवाय, गडचिरोलीपासून 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या पेनगुंडा येथे मुख्यमंत्र्यांनी जवान आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. सी-60 जवानांचा सत्कार करण्यात आला. तसेच पोलीस दलाला 5 बस, 14 चारचाकी गाड्या आणि 30 मोटारसायकलींचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीत हेलिकॉप्टर हँगरचे लोकार्पण तसेच नवीन हेलिपॅडचे उद्घाटन देखील करण्यात आले. यामुळे स्थानिक प्रशासनासाठी दुरगामी परिणाम होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील विकासाला मोठी चालना मिळाल्याचे चित्र आहे.