परभणी, 16 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर आज (दि.16) परभणीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीसाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. त्यांच्या अंत्यविधीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित होते. यावेळी प्रकाश आंबेडकर आणि उपस्थित भीम अनुयायींनी सोमनाथ सूर्यवंशी यांना आदरांजली वाहिली. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी याप्रसंगी भीमसैनिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
https://x.com/VBAforIndia/status/1868637948356473198?t=KDFUTYpXuEs1dtWhctYHog&s=19
https://x.com/VBAforIndia/status/1868648809288327270?t=S2iMg8tciojKvEKcoiDb9A&s=19
दरम्यान, 10 डिसेंबर रोजी परभणीत शहरात बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ 11 डिसेंबर रोजी परभणी बंद पुकारण्यात आला. परंतु या बंदच्या आंदोलनाला अचानकपणे हिंसक वळण लागले. यावेळी शहरात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. तसेच पोलिसांनी यावेळी 50 आंदोलकांना अटक केली. अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीतच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे पडसाद सध्या राज्यभरात उमटू लागले आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज राज्यभरात बंद पुकारण्यात आला होता. तसेच आंबेडकरी संघटनांकडून आज राज्यात ठिकठिकाणी विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली.
पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर
सोमनाथ सुर्यवंशी यांचा शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. शरीरावर अनेक जखमा असल्याने सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला असल्याचे पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप भीमसैनिकांनी केला आहे. त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी सध्या आंबेडकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. तसेच सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे.