ऑटोरिक्षाचे भाडे देण्यावरून मित्राची हत्या, आरोपीला अटक

मुंबई, 13 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईच्या कुर्ला परिसरात ऑटोरिक्षाचे भाडे देण्यावरून झालेल्या वादातून एकाने आपल्या मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी, 29 वर्षीय आरोपीला मुंबई गुन्हे शाखेने एका हत्येप्रकरणी अटक केली आहे. सैफ जाहिद अली असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने ऑटोरिक्षाचे भाडे देण्यावरून झालेल्या वादातून त्याचा मित्र छक्कन अली (वय-28) याची हत्या केली. या घटनेनंतर मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने आरोपीला कल्याण रेल्वे स्थानकातून अटक करून कुर्ला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान, हे दोघेही उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील होते.

https://x.com/ANI/status/1823185603191800039?s=19

रिक्षाचे भाडे देण्यावरून वाद

हे दोघेजण काही दिवसांपूर्वी कामानिमित्त मुंबईत आले होते. ते एका कपड्याच्या कारखान्यात कामाला होते. हे दोघेजण रविवारी रात्री दारू पिऊन एका रिक्षात बसले. त्यानंतर 30 रुपयांच्या रिक्षाच्या भाड्यावरून सैफ आणि छक्कन यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी सैफने छक्कनला मारहाण केली. त्यामुळे तो जमिनीवर पडला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

आरोपीला अटक

या घटनेनंतर सैफ जाहिद अली पळून गेला. त्याने कल्याण रेल्वे स्थानक गाठले. त्यावेळी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने आरोपीला कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली आणि त्याला कुर्ला पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या या आरोपीची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. तर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *