बारामती, 2 मेः बारामतीतील प्रसिद्ध सराफ व्यापाऱ्याची 45 लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर फसवणुकी प्रकरणात 11 जणांविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर फसवणुकीच्या प्रकरणात अनुराग महिंद्रा आरोरा (रा. हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती वरून, पुण्यातील हडपसर येथील अनुराग आरोरा आणि त्यांचे मुंबई स्थित बिझनेस पार्टनर अचल मित्तल या दोघांची मार्च 2018 पासून लिकीवलोन फायनान्स ही कंपनी सुरु केली. या कंपनीचे काम पुण्यातून चालविण्यात येते. बारामतीमधील पेन्सिल चौकातील चंदुकाका सराफ या दुकानात लिकीवलोन फायनान्सकडून सोन्याच्या दागिन्यांचे कर्ज प्रकरण करून रक्कम आदा करण्याचे काम केले जाते.
या कर्ज प्रकरणासाठी लिकीवलोन फायनान्स कर्जदारांकडून त्यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड, पगार स्लिप, बँक स्टेटमेंट, इन्कम टॅक्स रिटर्न आदी कागद पत्रांची फाईल ते चंदुकाका सराफ यांच्यामार्फत घेतात. तसेच कर्जदारांची कर्ज परत करण्याची पद्धत (सिबील स्कोर) चेक करून केला जातो.
दरम्यान, दिनांक 9 एप्रिल 2022 ते 11 एप्रिल 2022 रोजी चंदुकाका सराफ यांच्यामार्फत लिकीवलोन फायनान्स यांनी कर्जदार अभिजीत रामदास शेळके (रा. बेलवाडी तालुका इंदापूर) यांना कर्ज 6 लाख 50 हजार रुपये, कर्जदार बाळू सोनबा वाघमोडे (रा. हनुमंतवाडी शिरसाटवाडी तालुका इंदापूर) यांना 10 लाख रुपये, कर्जदार बाबा मोहन गायकवाड (रा. चिखली तालुका इंदापूर) यांना 6 लाख रुपये, कर्जदार अक्षय बापू मोहिते (रा. शेळगाव तालुका इंदापूर) यांना 7 लाख 50 हजार रुपये, कर्जदार धुळा पांडुरंग शेंडगे (रा. एकशिव तालुका माळशिरस) यांना 6 लाख रुपये, कर्जदार बाळासाहेब राजाराम पवार (रा. इंदापूर रोड बारामती) यांना 4 लाख रुपये, कर्जदार नितीन बबन पवार (रा. विद्यानगरी मालेगाव, तालुका बारामती) यांना 5 लाख रुपये अशी एकूण 7 कर्ज प्रकरणे प्राप्त झाली.
त्यावेळेस कर्जदारांनी काही प्रमाणात डाऊन पेमेंट केले. त्याप्रमाणे फिर्यादी आणि त्यांच्या टीम मार्फत कर्जदारांचे सिबील चेक केले. तसेच त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार कर्ज मंजूर करून त्यांना सुद्धा कर्ज रकमेचे सोन्याचे दागिने चंदुकाका सराफ यांच्या दुकानामार्फत देण्यात आले. त्यानंतर 12 एप्रिल 2022 रोजी आणखी 7 कर्ज प्रकरणे चंदुकाका सराफ दुकानातून ऑनलाईन प्राप्त झाले.
या प्रकरणाची कागदपत्रे फिर्यादीकडून चेक करीत असताना धक्कादायक प्रकार समोर आला. कर्जदारांनी अगोदर मंजूर केलेले कर्ज प्रकरणातील बँक स्टेटमेंट व आयटीआर हे एकच असल्याचे दिसून आले. यामुळे फिर्यादी यांनी सदर मंजूर केलेले 7 प्रकरणे पुन्हा पडताळणी केली असता, सादर केलेली बँक स्टेटमेंट व आयटीआय हे थोडाफार बदल करून सर्व स्टेटमेंट सारखेच असल्याचे दिसून आले. त्यानंतर फिर्यादी अनुराग आरोरा यांनी चंदुकाका सराफ दुकानातील मॅनेजर सुकेश्वर लक्ष्मण जगताप यांना फोनवरून सदर बोगस कर्ज प्रकरणाबाबत माहिती सांगितली.
सदर प्रकरणासंदर्भात फिर्यादी 14 एप्रिल 2022 रोजी चंदुकाका सराफ सोन्याचे दुकानात गेले. मॅनेजर जगताप यांनी सांगितले की, सदर प्रकरणात दिलेली कर्जदारांना फोन करून कर्ज प्रकरणाकरिता लागणारी काही कागदपत्र आवश्यक आहे, ते तुम्ही आणून द्या, असे सांगितले. मात्र फोन वर फोन करून देखील काहींनी फोन उचलले नाही. तसेच काहींनी आम्ही बाहेर गावी आहोत, आम्ही येऊ शकत नाही, असे सांगून सराफ दुकानात येण्यास टाळाटाळ केल्याचे जगताप यांनी सांगितले.
दरम्यान, प्रकरणे मंजूर केलेले वरील कर्जदारांसोबत कर्ज प्रकरणातील कागदपत्रे सादर करण्याकरिता चंदुकाका सराफ दुकानात सोहेल शेख (रा. वालचंदनगर जनशन शेख वाडी तालुका इंदापूर) ओमकार हनुमंत शिंदे (रा. तांदळवाडी तालुका बारामती) सोहोम (पूर्ण नाव पत्ता माहीत नाहीत) आसिफ सय्यद (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) हे वेळोवेळी दुकानात येत होते. या लोकांनी संगनमताने पेन्सिल चौकातील चंदुकाका सराफ सोने दागिन्याच्या दुकानात कर्जदारांत येऊ स्वतःचे अकाउंट, बँक स्टेटमेंट खोटे सादर करत फिर्यादी अनुराग आरोरो आणि चंदुकाका सराफ सोने दागिने दुकानात येत 45 लाख रुपयांची फसवणूक केली.
सदर प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी अभिजीत रामनाथ शेळके, बाळू सोनबा वाघमोडे, बाबा मोहन गायकवाड, अक्षय बापू मोहिते, धुळा पांडुरंग शेंडगे, बाळासाहेब राजाराम पवार, नितीन बबन पवार, सोहेल शेख, ओंकार हनुमंत शिंदे, सोहम (संपुर्ण नाव पत्ता माहित नाही) आसिफ सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 229 / 2022 भा.वि.क.कलम 420 ,465,467,468,471,34 याप्रमाणे बारामती तालुका पोलिस स्टेशनमध्ये 23 एप्रिल 2022 रोजी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपी बाळासाहेब राजाराम पवार याला अटका केली असून त्याच्याकडून 4 लाख रुपये रक्कम हस्तांतरित केली आहे. तसेच i 20 कार बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहे. सदर प्रकरणात अधिक तपास सुरु आहे.