रांची, 23 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना आजपासून खेळविण्यात येत आहे. हा सामना रांचीच्या जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम कॉम्पलेक्स या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत भारतीय संघ 2-1 असा आघाडीवर आहे.
https://twitter.com/BCCI/status/1760872261811060883?s=19
जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली
आजच्या सामन्यात भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी आकाश दीपला संधी देण्यात आली आहे. त्याचवेळी इंग्लंड संघात 2 बदल करण्यात आले आहेत. रेहान अहमद आणि मार्क वुडच्या जागी शोएब बशीर आणि ऑली रॉबिन्सनला संधी मिळाली आहे.
रांचीच्या मैदानावर भारताचे रेकॉर्ड चांगले
दरम्यान, आजचा सामना रांची येथील जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम कॉम्पलेक्स या मैदानावर खेळविण्यात येत आहे. भारतीय संघाने आतापर्यंत येथे एकही कसोटी गमावलेली नाही. रांचीमध्ये भारताने आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळलेले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धचा एक सामना अनिर्णित राहिला, तर एका सामन्यांत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून रांचीच्या मैदानावर न हरण्याचे रेकॉर्ड भारतीय संघाने कायम ठेवावे, अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमी करीत आहेत.
कशी आहे रांचीची खेळपट्टी?
रांचीची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. मात्र, खेळ जसजसा पुढे जाईल, तसतशी या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला याचा फायदा होणार आहे. तर या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 आणि कलर्स सिनेप्लेक्स या दोन चॅनलवर होणार आहे. त्याचबरोबर जिओ सिनेमा या ओटीटी ॲपवर देखील या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.
भारतीय संघ:-
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड संघ:-
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.