मुंबई, 09 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईत पाण्याच्या टाकीची सफाई करताना 4 कंत्राटी कामगारांचा दुर्दैवाने गुदमरून मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मुंबईतील नागपाडा येथील मिंट रोडवरील गुड लक मोटर ट्रेनिंग स्कूलजवळ रविवारी (दि.09) दुपारी घडली. याठिकाणी एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्या ठिकाणच्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता करताना ही दुर्घटना घडली. याची माहिती मुंबई महानगरपालिकेने एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.
https://x.com/ANI/status/1898694555085775282?t=EbbbmvkCP1vU5pyA7geWag&s=19
चार कामगारांचा मृत्यू
या दुर्घटनेत चार कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला असून, मृतांची ओळख पटली आहे. हसीपाल शेख (19), राजा शेख (20), जियाउल्ला शेख (36) आणि इमांडू शेख (38) अशी मृत कामगारांची नावे आहेत. तर, पुरहान शेख (31) हा जखमी असून त्याच्यावर मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे सध्या हळहळ व्यक्त केली जात आहे.
जखमीवर उपचार सुरू
मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी 12.29 वाजता घडली. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती एक तासानंतर, म्हणजेच 1.35 वाजता माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व कामगारांना बाहेर काढले. त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्व कामगारांना जे जे रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यातील 4 कामगारांना मृत घोषित केले. तर जखमी असलेल्या पुरहान शेखवर याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुर्घटनेचा तपास सुरू
दरम्यान, ही दुर्घटना नक्की कशामुळे घडली? याचा तपास सुरू असून, अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. कामगारांनी टाकीत उतरतेवेळी कोणतीही सुरक्षिततेची साधने परिधान केली होती का? याचा सध्या तपास केला जात आहे. तसेच अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत म्हणून सुरक्षा उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे.