भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन

नवी दिल्ली, 26 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरूवारी, 26 डिसेंबर 2024 रोजी, वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर दीर्घकाळ उपचार सुरू होते. परंतु गुरूवारी सायंकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यानंतर 8 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, सुमारे दोन तासांच्या उपचारांनंतर रात्री 9.51 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने देशभर शोककळा पसरली आहे.

https://x.com/ANI/status/1872326608058777648?t=pkgM6BZS4ybgDfCHdvDzIQ&s=19

दोन वेळा देशाचे पंतप्रधान!

डॉ. मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 या कालावधीत भारताचे पंतप्रधान म्हणून उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने आर्थिक स्थैर्य आणि विकासाची नवी उंची गाठली. 1991 च्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली. मनमोहन सिंग हे त्यांच्या शांत, प्रामाणिक आणि प्रभावी नेतृत्वासाठी नेहमी स्मरणात राहतील. साध्या जीवनशैलीचे ते एक उत्तम उदाहरण होते. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, आणि सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून देशाच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, दूरदृष्टी असलेला नेता गमावला आहे. देशाच्या प्रगतीत त्यांचे योगदान अजरामर राहील.

आर्थिक संकटाचा प्रभावी सामना केला

डॉ. मनमोहन सिंग यांची विद्वत्ता आणि साधेपणा त्यांची खास ओळख होती. त्यांच्या पंतप्रधानांच्या काळात देशाने 2008 च्या जागतिक आर्थिक मंदीचा प्रभावी सामना केला होता. देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि व्यवसायिकांसाठी त्यांनी यशस्वीपणे योजना राबविल्या होत्या. पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी देशात सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी अनेक सुधारणा केल्या. विद्यार्थी, अर्थतज्ज्ञ आणि राजकारण्यांसाठी डॉ. मनमोहन सिंग हे नेहमी प्रेरणास्थान राहिले. त्यांनी विज्ञान, शिक्षण, तंत्रज्ञान आणि जागतिक व्यापार क्षेत्रात भारताला एक आदर्श देश म्हणून उभे केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *