पुणे, 10 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) माजी आरोग्य मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिकेश सावंत बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त अनेक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. पुणे विमानतळावरून तो अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सावंत कुटुंबीय चिंतेत असून, पोलीस याबाबत कसून तपास करत आहेत.
बेपत्ता होण्याची नोंद
या प्रकरणी पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने तपास सुरू केला असून, ऋषिकेश सावंतचा ठावठिकाणा शोधण्यासाठी विविध ठिकाणी तपासणी केली जात आहे. त्याच्या गायब होण्यामागे कोणतेही कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू केली आहे, तसेच त्याच्या मोबाईल लोकेशनचा मागोवा घेतला जात आहे.
अपहरणाचा संशय, पोलीस तपास सुरू
दरम्यान, एका माजी मंत्र्याचा मुलगा अचानक बेपत्ता होणे ही अतिशय गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे अपहरणाचा संशयही व्यक्त केला जात आहे. ऋषिकेश सावंतने स्वतःहून कुठेतरी जाण्याचा निर्णय घेतला की त्याला बळजबरीने नेण्यात आले, याचा शोध पोलीस घेत आहेत. त्याच्या बेपत्ता होण्यामागे कोणतेही आर्थिक किंवा राजकीय कारण आहे का? याचाही तपास सुरू आहे.
अधिकृत माहितीची प्रतीक्षा
सध्या या प्रकरणावर अधिकृतरीत्या कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पुणे पोलिसांकडून तपास सुरू असून, लवकरच अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. ही घटना नेमकी कशी घडली? आणि ऋषिकेश सावंत कुठे आहे? याबाबत पुढील काही तासांत अधिक स्पष्टता येईल, अशी अपेक्षा आहे.