नागपूर, 19 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात उद्या (दि.20) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यादरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघातील काटोल – जलालखेडा रोडवर सोमवारी (दि.19) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात अनिल देशमुख हे जखमी झाले आहेत. यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांना जवळच्या ॲलेक्सिस रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे. त्यांच्यावर येथे उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच काटोल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
https://x.com/ANI/status/1858569168909738082?t=O319-_y25tlG3UHt3LS-Gw&s=19
हल्ल्यावरून राजकारण तापले
विधानसभा निवडणुकीच्या सांगता सभेवरून काल रात्री घरी परतताना काटोल – जलालखेडा रोडवर अनिल देशमुख यांच्या कारवर काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली. तर हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. तर दुसरीकडे भाजपने अनिल देशमुख यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अनिल देशमुख यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगून स्वतःवरच हा हल्ला केल्याचे भाजपने म्हटले आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी अनिल देशमुख यांच्या तक्रारीवरून चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेवरून सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.
https://x.com/NCPspeaks/status/1858540781788635227?t=EwZifAkg55HEhJr-Kj5j7A&s=19
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून हल्ल्याचा निषेध
अनिल देशमुख यांच्यावरील या हल्ल्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल देशमुख यांचा या हल्ल्यानंतरचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. “राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे उडवले जात आहेत. याचे उदाहरण आज निवडणुकीच्या सांगता सभेवरून घरी परतताना राज्याचे माजी गृहमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातून समोर आले. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे,” असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.