दिल्ली, 23 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) भारताचे माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे आज (दि.23) निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. बिशन सिंग बेदी यांना भारताचे महान फिरकी गोलंदाज म्हणून ओळखले जाते. बेदी यांनी भारतासाठी एकूण 77 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यामध्ये त्यांनी 273 विकेट घेतल्या होत्या. बेदी यांनी 31 डिसेंबर 1966 रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक स्टेडियम ईडन गार्डन्स येथे आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली. तर त्यांनी 1979 मध्ये ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली.
राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत ‘हा’ गोलंदाज
बेदी यांनी प्रामुख्याने 1966 ते 1979 या दरम्यानच्या कसोटी क्रिकेटचा काळ गाजवला. या काळात त्यांनी भारताकडून 67 कसोटी सामन्यात 266 विकेट घेतल्या. बेदी यांनी 1977-78 मध्ये एका कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 10 विकेट घेतल्या होत्या. ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. यासोबत त्यांनी 10 एकदिवसीय सामन्यात 7 विकेट घेतल्या. दरम्यान, बिशन सिंग बेदी यांच्याकडे 1976 साली भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली होती. मात्र त्यांच्या कर्णधारपदाच्या काळात भारताने घरच्या मैदानावर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या संघांविरुद्धच्या मालिका गमावल्या. त्यानंतर बेदी यांना कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले होते.
तत्पूर्वी बेदी यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी काही काळ भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापक म्हणून देखील काम पाहिले होते. दरम्यान, बिशन सिंग बेदी हे बॉलिवूड अभिनेता अंगद बेदी याचे वडील होते. तर अभिनेत्री नेहा धुपिया ही बेदी यांची सून आहे. बेदी यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. अनेक क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
औरंगाबादमध्ये 500 कोटींचे ड्रग्ज जप्त
One Comment on “माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे निधन”