माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोराने केली आत्महत्या

मुंबई, 09 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुंबईतील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना दहिसर येथे काल मध्यरात्री घडली. त्यानंतर त्यांना तात्काळ दहिसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू, तोपर्यंत या गोळीबाराच्या घटनेत अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नावाच्या व्यक्तीने गोळीबार केला आहे. या घटनेनंतर मॉरिसने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, घटनेच्या वेळी अभिषेक घोसाळकर हे त्याच हल्लेखोरासोबत बसून फेसबुक लाईव्ह करत होते.

https://twitter.com/ANI/status/1755621505151447236?s=19

पोलिसांकडून दोघांना अटक

दरम्यान काल रात्री माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीने गोळ्या घालून हत्या केली. ज्यामध्ये त्यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. त्यानंतर मॉरिसने स्वत:वर देखील गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी मॉरिस नोरोन्हा याच्या विरोधात पोलिसांत कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तर या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी अन्य दोघांना अटक केली आहे. त्यांची सध्या पोलीस चौकशी करीत आहेत. चौकशीतून अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

फेसबूक लाईव्ह दरम्यान घडली घटना!

तत्पूर्वी, पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांची हत्या केल्याचे म्हटले जात आहे. फेसबूक लाईव्ह दरम्यान ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेनंतर आरोपी मॉरिसनेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *