कोल्हापूर, 05 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी गावात श्री कल्याणताई माता देवीची यात्रा मंगळवारी (4 फेब्रुवारी) मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेदरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मात्र, महाप्रसादानंतर अनेकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला, त्यामुळे 250 हून अधिक नागरिकांना विषबाधा झाली. दरम्यान, हा महाप्रसाद खाल्ल्यानंतर नागरिकांना हा त्रास झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
https://x.com/PTI_News/status/1887050640062603664?t=KVQXVrkAi8EAlZjNa1S6lg&s=19
पोलीस अधिकाऱ्यांची माहिती
कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या शिरोळ येथील रुग्णालयात सुमारे 50 जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उर्वरित रुग्णांवर इतर दवाखान्यांमध्ये उपचार सुरू आहेत. नागरिकांना त्रास होऊ लागल्यानंतर तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली असून, प्रशासनाकडून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
हा महाप्रसाद खाल्ल्यानंतर नागरिकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तर सध्या या घटनेचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे शिवनाकवाडी गावात चिंतेचे वातावरण आहे. स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र विषबाधेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी अधिकारी सतर्क झाले आहेत. प्रशासनाने नागरिकांना घाबरू नका, असे आवाहन केले आहे. तसेच उपचार घेत असलेल्या लोकांच्या प्रकृतीवर प्रशासनाचे लक्ष आहे.