बारामती, 04 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) बारामती मध्ये भेसळ युक्त दुग्धजन्य पदार्थ बनवले जात आहेत. त्यामध्ये पेढे बर्फी कलाकंद रसमलाई रसगुल्ले हे पदार्थ भेसळ युक्त बनवले जात असल्याची तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे दिली होती. त्यानुसार, बारामती येथे मच्छी मार्केट शेजारी बारामती स्वीट होम या स्वीट होमवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकली. त्यावेळी अन्न व औषध प्रशासन अधिकारी कर्ने मॅडम यांनी सदर स्वीट होमची चौकशी करून याची चाचणी करण्यासाठी दुधापासून व खाव्यापासून बनवलेल्या पदार्थांचे नमुने घेतले. सदरची धाड करते वेळी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व अभिजित कांबळे व ऍडव्होकेट सम्राट गायकवाड उपस्थित होते.
अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी नमुने चाचणी अहवाल आल्यावर बारामती स्वीट या दुकानावर कायदेशीर कडक कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सदरची कारवाई जर झाली नाही तर अन्न व औषध प्रशासन कार्यालय यांच्या बाहेर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा अभिजीत कांबळे यांनी अन्न व औषध प्रशासनाला दिला आहे. तसेच ही कारवाई नवरात्र महोत्सवात करावी असे देखील अन्न व औषध प्रशासनाला अभिजीत कांबळे व पदाधिकारी यांनी सांगितले आहे.
यासोबतच माळेगाव बुद्रुक येथील गुऱ्हाळ घर येथे कृत्रिमरित्या साखरेचा वापर करून गुळ बनवला जात आहे याबाबत कांबळे यांनी अन्न व औषध प्रशासनाला कळवले होते. या धाडी दरम्यान साखरेची काही पोती आढळली होती. प्रशासनाने त्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत, असे सांगण्यात आले. या गुऱ्हाळावर देखील कारवाई करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.