स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई, 15 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे सर्व अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात राज्य प्रशासनातील सर्व प्रधान सचिव, विविध अधिकारी, मंत्रालयातील कर्मचारी आणि पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

https://x.com/mieknathshinde/status/1823951554577359038?s=19

https://x.com/mieknathshinde/status/1823962756841922804?s=19

मुख्यमंत्री काय म्हणाले?

गेल्या दोन वर्षात राज्याने चौफेर प्रगती केली आहे. विदेशी गुंतवणूक, समाजातील दुर्बल घटकांसाठी आखलेल्या नाविन्यपूर्ण योजना या माध्यमातून नागरिकांच्या प्रति असलेली बांधिलकी दाखवून दिलेली आहे. केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली 5 ट्रीलियन डॉलर्स बनवून जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी आगेकूच सुरू आहे. त्यात आपल्या राज्याचा वाटा मोठा असणार आहे, असे मुख्यमंत्री या कार्यक्रमात म्हणाले. राज्याने नुकतेच लॉजिस्टिक धोरण तयार केले असून त्या माध्यमातून 30 हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. देशाच्या एकूण उत्पन्नात राज्याचा वाटा 14 टक्के असून, उद्योग आणि सेवा क्षेत्रात राज्य अग्रेसर आहे. यंदा पाऊस उत्तम झाला असून पीके चांगली येणार अशी आशा निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकरी, युवक, कामगार, महिला भगिनी सर्वांचा सर्वांगीण विकास करण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

https://x.com/MahaDGIPR/status/1823934125729878491?s=19

घरोघरी तिरंगा अभियान राबविण्याचे आवाहन

तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी यावेळी घरोघरी तिरंगा अभियान राबविण्याचे व यशस्वी करण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले. दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हे अभियान राबविण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील जनतेने घरोघरी तिरंगा या मोहिमेला उदंड प्रतिसाद दिला आहे. यंदा 9 ऑगस्टपासून राज्यात घरोघरी तिरंगा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. तसेच घरोघरी तिरंगा या अभियानांतर्गत राज्यातील जनतेने आपल्या घरावर तिरंगा फडकावावा आणि तिरंगा ध्वजासोबतचा सेल्फी harghartiranga.com या वेबसाईटवर अपलोड करून या अभियानात मोठ्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *