पुण्यात अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण! प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या

पुणे, 26 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील पोलीस कवायत मैदानात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच याप्रसंगी अजित पवार यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना संबोधित केले.

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1750772143036756020?s=19

पुणे वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा: अजित पवार

पुणे जिल्ह्यातील शेती, उद्योग, व्यापार, रोजगार, स्वयंरोजगार, पर्यटन, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासोबतच पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन अजित पवारांनी केले. पुणे जिल्हा हा वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील रस्ते, मेट्रो मार्ग, रेल्वे मार्गाद्वारे विकासाला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. खोपोली ते खंडाळा मिसिंग लिंकचं काम अंतिम टप्प्यात आहे. शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी विविध विकासकामं सुरू करण्यात आली आहेत. नागरिकांनी या कामांसाठी सहकार्य करावे, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.

सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती देणारे प्रदर्शन उभारण्यात येणार!

पुणे शहर शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील गडकिल्ले, ऐतिहासिक स्थळ, अष्टविनायक, तीर्थक्षेत्र, राष्ट्रपुरुषांची स्मारके आदींच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. भिडेवाडा येथे ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती प्रदर्शित करणारे प्रेरणादायी स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.

शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत: अजित पवार

“पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यात येत आहे. राज्य शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ सुरू केल्याने शेतकरी कुटुंबांना 12 हजार रुपये वार्षिक लाभ होणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेवर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यातील वीज उपकेंद्र आणि वीज वाहिन्यांच्या विकासावर भर देण्यात येत आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा 948 कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा राज्य समितीकडे सादर करण्यात आला असून 400 कोटींची अतिरिक्त मागणीही करण्यात आली आहे,” असे अजित पवार यावेळी म्हणाले.

लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत!

“राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये पुणे जिल्ह्याने सलग दुसऱ्यांदा देशपातळीवर सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. नागरिकांनी या कामगिरीत सातत्य ठेवत शहर आणि जिल्हा स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. एक जबाबदार नागरिक म्हणून राज्याच्या प्रगतीत प्रत्येक व्यक्तीचे योगदान महत्वाचे असून त्यासाठी सर्वांनी यापुढच्या काळात अधिक सक्रीय भूमिका बजावावी. देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावा,” असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *