पहिला कसोटी सामना; दुसऱ्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिका 5 बाद 256 धावा

सेंच्युरियन, 27 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ आज समाप्त झाला आहे. दुसऱ्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिका संघाची धावसंख्या 5 बाद 256 इतकी झाली आहे. तर आफ्रिकेने या सामन्यात 11 धावांची आघाडी घेतली आहे. सध्या त्यांचे डीन एल्गर 140 आणि मार्को जेंन्सन 3 धावांवर खेळत आहे.

https://twitter.com/BCCI/status/1740039438510772427?s=19

तत्पूर्वी, दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने 8 बाद 208 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी भारताचा डाव पहिल्या सत्रात 67.4 षटकात 245 धावांवर संपुष्टात आला. भारतातर्फे केएल राहुलने शानदार शतकी खेळी खेळली. त्याने 137 चेंडूत 14 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 101 धावा केल्या. या सामन्यात आफ्रिकेच्या सर्वच गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने सर्वाधिक 5 विकेट, तर नांद्रे बर्जरने 3 विकेट घेतल्या.



त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सत्रात पहिल्या डावाला सुरूवात केली होती आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी 66 षटकांत 5 बाद 256 धावा केल्या. यावेळी आफ्रिकेच्या डीन एल्गरने शानदार शतकी खेळी केली. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 14 वे शतक झळकावले. तसेच डेव्हिड बेडिंगहॅमने देखील पहिल्या डावात अर्धशतक केले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 131 धावांची भागीदारी केली.



ही भागीदारी भारताची डोकेदुखी ठरत असताना तेंव्हाच डेव्हिड बेडिंगहॅम 56 धावांवर बाद झाला. त्याला मोहम्मद सिराजने क्लीन बोल्ड आऊट केले. त्यानंतर काही वेळातच खराब हवामानामुळे आजच्या दिवसाचा खेळ थांबविण्यात आला. तेंव्हा आफ्रिकेच्या 5 बाद 256 धावा झाल्या होत्या. सध्या दक्षिण आफ्रिकेचे एल्गर नाबाद 140 आणि मार्को जेंन्सन 3 धावांवर खेळत आहेत. त्यामुळे उद्याच्या दिवशी आफ्रिकेच्या फलंदाजांना लवकर बाद करण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असणार आहे. दरम्यान, पहिल्या डावात भारताकडून मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 आणि प्रसिध कृष्णा याने 1 विकेट घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *