मुंबई, 06 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) भाविकांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता यावे, यासाठी मुंबई ते अयोध्या ही पहिली ‘आस्था ट्रेन’ मुंबईतून अयोध्येकडे रवाना झाली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या आस्था ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, आमदार मनिषा चौधरी, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार तमिल सेल्वन आणि आदी मान्यवर आणि रामभक्त उपस्थित होते. यावेळी रामनामाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
रामभक्तांना सुरक्षित प्रवास आणि उत्तम सुविधेसह दर्शनाची संधी मिळणार!
सुमारे 500 वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष आणि हजारो बलिदानानंतर अयोध्येत उभारलेल्या भव्य राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी जगभरातील रामभक्त आतुर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची पावन भूमी असलेल्या महाराष्ट्रातून अयोध्येपर्यंत ‘आस्था स्पेशल ट्रेन’ सुरू झाल्याने राज्यातील रामभक्तांना सुरक्षित प्रवास आणि उत्तम सुविधेसह दर्शनाची संधी मिळणार आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. मुंबईतून या पहिल्या ट्रेनने अयोध्येला जाणारे रामभक्त अत्यंत भाग्यशाली आहेत. ‘रामलला हम आयेंगे मंदिर भव्य बनायेंगे’ ही घोषणा व स्वप्न सत्यात उतरविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार! असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
48 लोकसभा मतदार संघातून अयोध्येसाठी विशेष ट्रेन
दरम्यान, अयोध्या येथील श्रीराम मंदिरामध्ये 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाची प्रतिष्ठापना झाली होती. त्यानंतर देशभरातून अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरू झाला आहे. राज्यातील राम भक्तांना अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता यावे, यासाठी भाजपकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत. या विशेष ट्रेन भाविकांसाठी मोफत असणार आहेत. भाजपचे हे मिशन अयोध्या पुढील काही महिन्यांपर्यंत सुरू राहणार आहे. येत्या काही दिवसांपासून राज्यातील 48 लोकसभा मतदार संघातून अयोध्येसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. तर या ट्रेनने अयोध्येला जाण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी आपले नाव देण्यासाठी आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक यांची नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.