पुणे, 21 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुणे मंडई मेट्रो स्टेशनच्या तळमजल्यावर रविवारी (दि.21) मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर 5 मिनिटातच त्यांनी ही आग विझविली. ही आग मंडई मेट्रो स्टेशनच्या तळमजल्यावरील एका फोम मटेरियलला लागली होती.
https://x.com/ANI/status/1848104208123527516?t=PTO6idpGS_qFP_QsjvH0Dw&s=19
जीवितहानी वा वित्तहानी नाही
प्राथमिक माहितीनुसार वेल्डिंगचे काम सुरू असताना ही आग लागली. या आगीमुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. याची माहिती पुणे अग्निशमन विभागाने दिली आहे. दरम्यान, या आगीमुळे मेट्रोच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. या घटनेनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट केले आहे.
मुरलीधर मोहोळ यांचे ट्विट
मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी प्रकार घडला होता. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सदरील घटना मेट्रोचे प्रवासी कामकाज संपल्यानंतर घडली होती. मेट्रो स्टेशनच्या भागात वेल्डिंगची काम सुरू असताना हा प्रकार घडला. यासंदर्भात मेट्रोचे कार्यकारी संचालक श्रवण हर्डीकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली असून या घटनेचा मेट्रो सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे मेट्रो प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे, असे ट्विट मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.