झाशी, 16 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील वैद्यकीय विद्यालयाच्या नवजात अतिदक्षता विभागात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला. तर जखमी बालकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी (दि.15) रात्रीच्या सुमारास ही आग लागली. झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयात ही दुर्घटना घडली. आग लागली तेंव्हा या वैद्यकीय विद्यालयात 54 नवजात बालकांना दाखल करण्यात आले होते.
https://x.com/AHindinews/status/1857504758069854416?t=6yPF-nII83gKGYtpUcl89w&s=19
44 बालकांचे प्राण वाचवले
या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि बचाव पथकाने 44 बालकांना या आगीतून बाहेर काढले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, या दुर्घटनेत दुर्दैवाने 10 बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 3 बालकांची ओळख अद्याप पटलेली नाही. या बालकांची ओळख पाठविण्याचे काम सध्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याची माहिती मुख्य वैद्यकीय अधीक्षक सचिन माहोर यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचा अंदाज
महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरला काल अचानकपणे आग लागली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे जास्त ऑक्सिजन असल्याने ही आग लगेचच वाढत गेली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याचा सध्या तपास केला जात आहे.
https://x.com/PMOIndia/status/1857634816029593637?t=Y29PgihPtE20wRw7AClrAg&s=19
पंतप्रधानांनी केली आर्थिक मदत जाहीर
दरम्यान, या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करीत मृत्यू झालेल्या बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून जाहीर केली आहे. “हृदयद्रावक! उत्तर प्रदेशातील झाशीच्या मेडिकल कॉलेजला लागलेल्या आगीची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. ज्यांनी आपली निष्पाप मुले गमावली आहेत त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना. त्यांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन मदत आणि बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.